img

आमच्याबद्दल

महाराष्ट्र शासन राजपत्र दि.28 एप्रिल 1997 नुसार सन 1997 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 26 अन्वये महामंडळाची स्थापना मार्च, 1997 मध्ये झाली. स्थापनेच्या वेळी महामंडळाकडे विदर्भातील 10 मोठ्या प्रकल्पांचे बांधकाम सोपविण्यात आले होते. तद्नंतर महाराष्ट्र राजपत्र दि.23 नोव्हेंबर, 1998 नुसार सन 1998 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 15 अन्वये एकूण 86 प्रकल्प पुर्ण करण्याची जबाबदारी महामंडळावर टाकण्यात आली. तद्नंतर महाराष्ट्र शासन राजपत्र दि.13 एप्रिल 2007 नुसार सन 2007 चा महाराष्ट्र अधिनियम क्र.8 अन्वये विदर्भ प्रदेशातील शासनाकडे विहीत असलेल्या सर्व सर्वेक्षणाधीन, अन्वेषणाधीन व बांधकामाधीन प्रकल्पांचे काम महामंडळाकडे सोपविण्यात आले आहे. महामंडळाचे कार्यक्षेत्रात विदर्भातील नागपूर व अमरावती या दोन महसूल विभागांचा समावेश आहे. नागपूर विभागात (1) नागपूर, (2) भंडारा, (3) गोंदिया,(4) गडचिरोली, (5) चंद्रपूर व (6) वर्धा असे 6 जिल्हे तर अमरावती विभागात (1) अमरावती, (2) यवतमाळ, (3) वाशिम, (4) अकोला व (5) बुलढाणा असे 5 जिल्हे आहेत. विदर्भाचे भौगोलिक व लागवडीलायक क्षेत्र खालीलप्रमाणे आहे.

प्रदेश भौगोलिक क्षेत्र (लक्ष हेक्टर) लागवडी लायक क्षेत्र (लक्ष हेक्टर) लागवडी लायक क्षेत्राची भौगोलिक क्षेत्राशी टक्केवारी अंतिम सिंचन क्षमता (लक्ष हेक्टर) अंतिम सिंचन क्षमतेची लागवडी लायक क्षेत्राशी टक्केवारी शेरा
नागपूर विभाग 51.34 23.24 45.27% 13.00 55.93% विदर्भातील पर्जन्यमान सुमारे 550 मी.मी. ते 1700 मी.मी. दरम्यान आहे.
अमरावती विभाग 46.09 33.78 73.29% 9.46 28.00%
एकुण विदर्भ 97.43 57.02 58.53% 22.46 39.28%

विदर्भाचे भौगोलिक क्षेत्र गोदावरी व तापी खोऱ्यामध्ये विभागलेले आहे. गोदावरी खोऱ्यातील खडकपुर्णा, पैनगंगा, वर्धा, प्राणहिता, निम्न गोदावरी व इंद्रावती ह्या उपखो-यात तसेच तापी खोऱ्यातील पूर्णा, तापी ह्या उपखोऱ्यात व महानदी खोरे मिळून विदर्भाच्या वापराकरिता 20964.89 दलघमी (740.286 टी.एम.सी.) पाणी उपलब्ध आहे.